खोकेवाला आला हो खोकेवाला आला…! (संपादकीय)

297 0

एकनाथ शिंदेंनी बंड केलं कालांतरानं ते थंडही झालं पण या बंडामुळं त्यांच्या विरोधकांनी दिलेली घोषणा आजही तितकीच गरमागरम आहे. या घोषणेमुळं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापू लागलंय. ही घोषणा म्हणजे ’50 खोके एकदम ओके’ ! शिंदे गटातील आमदारांपैकी एकही आमदार या घोषणेपासून वाचू शकला नाही. दिवाळीसारखा सण-उत्सव असो की लग्न समारंभ; यातील एका जरी आमदारानं एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली की लोक म्हणतात, ‘खोकेवाला आला हो खोकेवाला आला…!’

……………………

50 खोक्यांची घोषणा; शिंदे गटाच्या आमदारांना सहन होईना !

शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केलं, असा आरोप त्यांच्यावर सातत्यानं केला जातोय. त्यामुळं शिंदे गटातील आमदारांची बेचैनी वाढू लागलीये. अपक्ष आमदार बच्चू कडूंनी तर आपली बेचैनी प्रत्यक्षरित्या बोलून दाखवलीये. आतापर्यंत विरोधकांकडून शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप होत होता पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार रवी राणांनी देखील हा आरोप केला आणि रवी राणा व बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू झाला. बच्चू कडूंना कोणताही पक्ष नाही. ‘खोके आणि ओके’ हा त्यांचा पक्ष आहे, असं रवी राणांनी काय म्हटलं बच्चू कडूंनी त्यांना खोके घेतल्याचा पुरावा द्या नाहीतर माझ्या सोबत असणाऱ्या आमदारांच्या मदतीनं आम्ही 1(नोव्हेंबर) तारखेला आमची ताकद दाखवून देऊ, असं आव्हानच दिलं. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्यानं केला जाणारा हा 50 खोक्यांचा प्रचार आता संपूर्ण राज्यभरात पोहोचलाय. विधिमंडळ अधिवेशन, जाहीर सभा आणि गावागावांत ’50 खोके एकदम ओके’ हे वाक्य आता उच्चारलं जाऊ लागलंय. ‘शिंदे गटाचा आमदार का ? मग बरोबर; 50 खोके एकदम ओके,’ हे वाक्य आता सर्वांच्याच तोंडी बसलंय. बैलपोळ्या दिवशी बैलाच्या पाठीवर देखील ’50 खोके एकदम ओके,’ हे वाक्य लिहिल्याचं लोकांनी पाहिलं.
………………………..

राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन चार महिने लोटले पण अजूनही हा 50 खोक्यांचा आरोप शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना खोडून काढता आलेला नाही. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 ची विधानसभा निवडणूक पाहाता शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता कायम ठेवण्यासाठी विरोधक ‘ 50 खोके एकदम ओके’ ही घोषणा थंड पडू देणार नाहीत हे नक्की !

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News
error: Content is protected !!