आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्यापुणेराजकारण

रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे, चित्रा वाघ यांचे पुणे पोलिसांना पत्र

मुंबई- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. त्या पीडितेने देखील याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी ही तक्रार करण्यासाठी चित्रा वाघ यांनी आपल्यावर दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केल्यामुळे पुन्हा या प्रकरणाला वेगळ वळण मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीमधील महिला नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.

याबाबत आच चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिलं आहे. मी पीडितेला सर्वतोपरी मदतचं केली. तरीही माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आले आहेत. ती एकटी पडली असेल म्हणून मी तिला मदत केली. मात्र माझ्यावरच आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप धादांत खोटे असून याची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

माझ्यावर आरोप करण्यासाठी पीडितेवर आरोप करायला दबाव टाकला जात असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला असून कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलीस सखोल चौकशी करतील ही अपेक्षा असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

काय आहे प्रकरण ?

पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला तसेच जबरदस्तीने आपला गर्भपात केला असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पीडितेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचं खळबळजनक दावा केल्यामुळे प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.