राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग होताना पाहायला मिळते नुकतंच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुलगा सुरेंद्र पठारेसह तीन माजी नगरसेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वीच पुणे विभाग म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि कागल मधील युवा नेते समरजीतसिंह राजे घाडगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यानंतर आता चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाला पुन्हा एकदा धक्का बसणार असल्याचा बोलला जात असून विद्यमान आमदारच तुतारी फुंकण्याच्या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उत आलाय.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या आमदार झाल्या होत्या. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपाचे पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याने एकाच कुटुंबामध्ये दोघांना तिकीट मिळणार नसल्याने अश्विनी जगताप या वेगळ्या मार्ग निवडण्याच्या भूमिकेत असल्याचं बोललं जातंय