मुंबई: भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला.
तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी प्रदेश भाजपातर्फे शुभेच्छा दिल्या.ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार बबनराव लोणीकर, सुधीर गाडगीळ, सुनील कांबळे व नारायण कुचे उपस्थित होते.