‘राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे’, खासदार उदयनराजे यांची राज्यपालांच्या ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

304 0

औरंगाबाद- समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानाचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोध केला असून राज्यपालांनी आपले विधान मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. याबाबतचे ट्विट उदयनराजे यांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं आहे.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?

“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

या वक्तव्याचा निषेध करत खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत राज्यपालांनी आपले विधान मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. खासदार उदयनराजे म्हणतात की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.

दरम्यान, कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (28 फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.