राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना आता भाजपाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
भाजपानं जो पॅटर्न राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या निवडणुकीसाठी वापरला तोच पॅटर्न भाजप महाराष्ट्र विधानसभेसाठी वापरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमका काय आहे पॅटर्न?
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 160 जागा लढण्याची तयारी करत असून या 160 मतदारसंघात 160 पक्ष निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हे सर्व पक्ष निरीक्षक त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघात पोहचतील आणि मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतील.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवली जातील. हे पक्षनिरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघात किती जण निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहे, याची चाचपणी केली जाईल. या संभाव्य उमेदवारांची नावे आणि इच्छुकांची नावे आणि त्यांची माहिती एका लिफाफ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येईल. 160 मतदारसंघातून आलेल्या लिफाफ्यांच्या आधारे संबंधित मतदारसंघातील उमेदवार ठरवला जाईल.