नुकताच महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.
सलग सातवेळा संगमनरमधून बाळासाहेब थोरात विजयी झाले होते. अनेक महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी देखील थोरात यांनी सांभाळली असून 2024 च्या निवडणुकीत मात्र बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी पराभूत केलं आहे.
कोण आहेत अमोल खताळ
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खताळ यांची ओळख आहे. विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर अमोल खताळ यांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली होती. अमोल खताळ हे सुरुवातीच्या काळात संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2017 पासून ते भाजपा पक्षामध्ये सक्रिय होते.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर भाजपा महायुती नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत ते जायंट किलर आमदार ठरले आहेत.