राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ‘राज’पुत्र अमित राज ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर वरळी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंचे पुत्र यंदा निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब अजमावणार आहेत
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी अनेक मनसैनिकांची इच्छा होती तशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर अमित ठाकरेंसाठी भांडुप आणि माहीम या दोन मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली आणि अखेर माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडूनही उमेदवार दिला जाऊ शकतो आणि यामुळं माहीममध्ये तिरंगी लढत होऊ लागते.
यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून पुन्हा आदित्य ठाकरेंनाच उमेदवारी मिळणार आहे तर या ठिकाणी महायुतीदेखील उमेदवार देणार असल्यानं या मतदारसंघातही तिरंगी लढत होणार आहे.
या दोन्ही मतदारसंघात मागील निवडणुकीमध्ये कशी लढत झाली होती?
_____________________________
2019 च्या निवडणुकीमध्ये माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सदानंद उर्फ सदा सरवणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे, काँग्रेसकडून प्रवीण नाईक निवडणूकीच्या रिंगणात होते.
या निवडणुकीत सदा सरवणकर 61,337 मतं मिळवत विजय मिळवला होता.
मनसेच्या संदीप देशपांडे यांना 42,690 मतं मिळाली होती
काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या प्रवीण नाईक यांना 15,246 मतं मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर होते
_____________________________
2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेश माने, वंचित बहुजन आघाडीच्या गौतम गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती.
या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांना 89,248 मतं मिळाली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना 21,821 मतं मिळाली होती
वंचित बहुजन आघाडीच्या गौतम गायकवाड यांना 6,572 मतं मिळाली होती
_____________________________
2019 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देत या ठिकाणी उमेदवार उभा केला होता त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रमाणात ही निवडणूक सोपी मांडली जात होते मात्र अमित ठाकरेंच्या विरोधात तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने आता नेमकं कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं असेल…