पाटील VS पाटील: आर.आर.आबांच्या लेकासमोर अजित पवारांचा तगडा उमेदवार

70 0

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्वतःची वेगळी ओळख आणि प्रस्थ तयार केलेले दिवंगत आर आर पाटील यांचे आणि विद्यमान आमदार सुमन पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या रोहित पाटील यांच्यासमोर अजित पवार गटाचा मातब्बर उमेदवार रिंगणात असणार आहे. ज्यामुळे रोहित पाटील यांचा पहिलाच निवडणुकीत कस लागणार आहे. कशी असणार आहेत तासगाव- कवठे महांकाळ विधानसभेची समीकरणं पाहूया..

तासगाव- कवठे महांकाळच्या विद्यमान आमदार सुमन पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. रोहित पाटील यांच्या नावावर तासगाव विधानसभेसाठी आधीच शिक्कामोर्तब झालं होतं. रोहित पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असतानाच अजित पवार गटाने मास्टर स्ट्रोक खेळत संजय काका पाटलांना उमेदवारी दिली.

रोहित पाटील हे गेल्या काही वर्षांपासून समाजकारणात असून अडीच वर्षांपासून ते विधानसभेची तयारी करत आहेत. तरुण तडफदार नेतृत्व असल्यामुळे त्यांना तरुणांचा पाठिंबा मिळतोय. त्याचबरोबर आधी आर आर पाटील नंतर सुमन पाटील यांनी केलेल्या कामांच्या बळावर रोहित पाटील हे सहज विजयी होतील, असं वाटत असतानाच संजय काका पाटलांच्या एन्ट्रीनं या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे

दिवंगत आर आर पाटील आणि संजय काका पाटील हे कट्टर विरोधक होते. संजय काका यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. 1999 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून आर आर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2004 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तेव्हाही आर आर पाटलांनी बाजी मारली. पुढे आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातील मतभेद संपवून संजय काका हे राष्ट्रवादीत गेले. सहा वर्ष पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. तरीही 2014 साली संजय काका हे भाजपमध्ये गेले. आणि थेट खासदार झाले. पुढे 2019 ला ही संजय काका पाटील खासदार म्हणून विजयी झाले मात्र 2024 ला अपक्ष विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांचा पराभव केला त्यानंतर आता पुन्हा ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

रोहित पाटलांमुळे तासगावची निवडणूक ही एकतर्फी होईल असं म्हटलं जात असतानाच अजित पवारांनी मोठी खेळी खेळली. ज्यामुळे पाटील विरुद्ध पाटील अशा या लढतीत तगडी फाईट होणार आहे

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide