महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जर तुम्हाला मतदान यादीत तुमच नाव आहे का नाही हे, मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी पहायचं असेल, याची खात्री करून घ्यायची असेल तर एक घरबसल्या सोप्पी पद्धत आहे. बऱ्याचदा असं होत की मतदारांकडे ओळखपत्र असतं, पण मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता येत नाही. त्यामुळे अशी अडचण टाळण्यासाठी घरबसल्या तुमचं नाव मतदार यादीत कसं तपासायचं ते जाणून घ्या.
मतदार यादीत नाव कसं शोधाल?
•निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लॉग इन करा
सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या आधिकृत वेबसाईटवर https://www.eci.gov.in जा. मुख्य पृष्ठावर ‘Search Your Name in Voter List’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
•राज्य निवडा आणि माहिती भरा
पुढील पानावर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाका.त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड भरा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
•तुमची माहिती पाहा
जर तुमचं नाव मतदार यादीत असेल, तर त्या पेजवर तुमची संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये तुमचं नाव, मतदार केंद्र, आणि इतर तपशील सापडतील. तुमच्यासाठी त्या पेजचा प्रिंटआऊट देखील घेऊ शकता.
•मोबाईल क्रमांक वापरून नाव तपासा
जर तुम्ही मतदार यादीत तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवलेला असेल, तर मोबाईलद्वारे देखील नाव तपासता येतं. वेबसाईटवर मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड भरा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
SMS आणि कॉलद्वारे नाव कसं तपासायचं?
•SMS सेवा:
-तुमच्या मोबाइलवर ‘ECI (स्पेस) Voter ID’ असा मेसेज टाइप करा.
-तुमचा EPIC नंबर टाका आणि मेसेज पाठवा.
ही सेवा मोफत आहे आणि तुम्हाला तुमचं नाव मतदार यादीत आहे का याची माहिती मिळेल.
•टोल फ्री कॉल सेवा:
-तुम्ही 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही नाव तपासू शकता.
मतदान हा आपल्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचं नाव आहे का, हे वेळेत तपासा आणि 20 नोव्हेंबरला मतदान करण्यासाठी सज्ज व्हा! तुमच्या प्रत्येक मताचा मान असतो आणि त्यावर देशाचं भविष्य अवलंबून असतं,त्यामुळे नक्की मतदान करा!