MNS Raj Thakre

मनसेला किती जागा मिळणार ? काय सांगतायत एक्झिट पोल

120 0

महाराष्ट्र विधानसभा 2024 साठीचं मतदान काल पार पडलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली असून यावेळी राज्यात एकूण 65.11% मतदान झालं. त्यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मनसेला नेमक्या किती जागा मिळतील याचा अंदाज देखील एक्झिट पोल मधून समोर आला असून यावेळी ही मनसेच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता जास्त आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी टप्प्याटप्प्याने 138 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर, आणि फॉर्म पास झाल्यानंतर एकूण 123 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. याच जागांचा एक्झिट पोल आता समोर आला आहे.

काय सांगतात एक्झिट पोल ?

‘मॅट्रिझ’च्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील. तर मनसे, वंचित, अपक्ष आणि बंडखोरांना आठ ते दहा जागा मिळू शकतात. तर ‘चाणक्य’च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 150 ते 160 जागांवर यश मिळू शकतं मनसे, वंचित आणि अपक्षांना सहा ते आठ जागा मिळू शकतात. त्याचबरोबर ‘इलेक्ट्रोल एज’च्या एक्झिट पोलनुसार मनसे, वंचित, एमआयएम आणि अपक्ष यांना केवळ 20 जागा मिळतील. तर जेव्हीसीच्या सर्व्हेनुसार अपक्ष आणि लहान-मोठे पक्षांना मिळून 12 ते 13 जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आली आहे.

एक्झिट पोल केवळ अंदाज

एक्झिट पोल नुसार, यंदाही मनसे आणि वंचितला अपेक्षित यश मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरीही हा केवळ अंदाज असून या एक्झिट पोल खरे ठरतीलच असं नाही. त्यामुळे खरा अंतिम निकाल 23 तारखेला लागेल. तेव्हाच मनसेच्या पारड्यात किती जागा पडणार हे स्पष्ट होईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!