विधानसभा निवडणुकांचे प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच उमेदवार आपापला प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूर दक्षिण पश्चिम मधून जोरदार प्रचार करताना दिसत आहेत मात्र सध्या देवेंद्र फडणवीस हे आपल्या मालमत्तेमुळे चर्चेत आले आहेत. खरंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जास्त मालमत्ता आहे.
विधानसभा 2024 साठी उमेदवारी अर्ज भरताना अर्जाबरोबर जोडलेल्या शपथपत्रात फडणवीसांच्या मालमत्तेची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याच आधारे देवेंद्र फडणवीस यांची मालमत्ता किती आहे हे जाणून घेऊया.
फडणवीसांची मालमत्ता किती?
राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकूण 5.2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे 4.6 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यात शेतजमीन आणि निवासी मालमत्तेचाही समावेश आहे. तर त्याचबरोबर फडणवीसांकडे 56 लाख रुपयांची जंगम मालमत्ता देखील आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासह फडणवीस कुटुंबातील एकाही सदस्याच्या नावे चार चाकी नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
अमृता फडणवीस जास्त श्रीमंत
मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांच्या नावे 7.9 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये 95 लाखांची स्थावर मालमत्ता असून 6.9 कोटी जंगम मालमत्ता आहे. त्यात विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीस यांच्याकडून 62 लाखांचं कर्ज घेतलं आहे.
थोडक्यात फडणवीस दाम्पत्याकडे तेरा ते साडेतेरा कोटी रुपयांची संपत्ती सद्यस्थितीला आहे. मात्र यामध्ये एकाही कारचा समावेश नाही. त्याचबरोबर फडणवीसांच्या नावे मुंबईत एकही घर नाही. यावरच बोलताना ‘महाराष्ट्रात आजवर 20 मुख्यमंत्री झाले. त्यापैकी मी एकटाच असा मुख्यमंत्री आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचं घर नाही. आजही माझं स्वतःचं घर नागपूरमध्येच आहे आणि मला मी नागपूरकर असल्याचा अभिमान आहे’, असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.