राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारी करत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत अखेर वडगाव शेरीतून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कल्याणी नगर मधील पोर्षे अपघात प्रकरणानंतर आमदार सुनील टिंगरे हे चांगले चर्चेत आले होते या सोबतच वडगाव शेरी मतदारसंघात इच्छुक असणारे भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्यानं कदाचित महायुतीमध्ये वडगाव शेरीत मतदारसंघाबाबत अदलाबदल होईल असं बोलला जात होतं मात्र अखेर उमेदवारीची माळ सुनील टिंगरे यांच्याच गळ्यात पडली आहे.
यासोबतच शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अशोक पवारांना विरोधात माऊली कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात आर आर आबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघात निशिकांत पाटील यांना तर अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.