कोथरूडमध्ये तिरंगी लढत; मनसेचे किशोर शिंदे जायंट किलर ठरणार ?

188 0

पुण्यातील बहुचर्चित असा मतदारसंघ असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांसमोर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि याआधीही निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणारे मनसेचे किशोर शिंदे यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या तीनही नेत्यांची कोथरूड मध्ये टाकत किती आहे आणि हे तीनही नेते एकमेकांसमोर विधानसभेच्या रिंगणात असल्यामुळे इथलं समीकरण नेमकं कसं असेल पाहूया…

मतदार संघाच्या पुनर्रचनेत 2008 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा जन्म झाला. त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युतीचे उमेदवार, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे यांच्यात टफ फाईट झाली. मोकाटेंना 52055 तर शिंदेंना 44,843 इतकी मतं मिळाली आणि अवघ्या सात- आठ हजारांच्या फरकाने चंद्रकांत मोकाटे विजयी झाले.

पुढे 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे कोथरूड मधून भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना कडून पुन्हा चंद्रकांत मोकाटे हे विधानसभेच्या रिंगणात होते. यावेळी मात्र मोकाटे यांना केवळ 36,279 मतं मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. तर मेधा कुलकर्णी या 1,00,941 मतांनी विजयी झाल्या. आणि तेव्हापासूनच कोथरूड भाजपचा बालेकिल्ला बनला. मात्र ही निवडणुकही किशोर शिंदे यांनी लढवली होती आणि तेव्हा ते 21,392 मतांसह चौथ्या क्रमांकाचे उमेदवार होते.

2019 ला कोथरूडच्या स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली आणि तेव्हापासूनच पुन्हा कोथरूड मधली समीकरणं बदलली. कशी झाली होती तेव्हाची निवडणूक आणि आत्ताच्या निवडणुकीची समीकरणे कशी असणार आहेत पाहूया…

2019 ला बाहेरचा उमेदवार दिल्याने स्थानिक कोथरूडकर नाराज झाले होते. त्यातच विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यादेखील नाराज होत्या. कोथरूडमध्ये इच्छुकांची फळी असतानाही कोल्हापूरचा उमेदवार का ? असा प्रश्न विचारला गेला. त्यामुळेच चंद्रकांत पाटलांना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली. तर त्यांना पराभूत करण्यासाठी इतर मुख्य पक्षांनी मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी किशोर शिंदे यांनी तगडी फाईट दिली. त्यांनी जवळपास 80 हजार मतं मिळवली मात्र एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवत चंद्रकांत पाटलांनी विजयाचा नारळ फोडला.

यावेळी देखील बाहेरचा उमेदवार न देता स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी असा सूर भाजपात होता. मात्र तरीही पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात आता महाविकास आघाडी तर्फे कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिली गेली आहे. तर मनसेचे किशोर शिंदे पुन्हा रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मानणारा वर्ग कोथरूडमध्ये असला तरीही, मोकाटे हे गेली 10 वर्ष पूर्ण शांत होते तर कोथरूड विधानसभेची प्रत्येक निवडणुक लढवून किशोर शिंदे हे आपण ऍक्टिव्ह असल्याचं दाखवून देत होते. दुसरीकडे गेल्या पाच वर्षात चंद्रकांत पाटलांनी स्वतःचा वोटरही तयार केला आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असे दोनही मोठे नेते कोथरूडचेच असल्यामुळे त्यांनीही सर्व ताकद पणाला लावून चंद्रकांत पाटलांना निवडून आणायचं निर्धार केलाय. त्यामुळे विद्यमान चंद्रकांत पाटलांसमोर चंद्रकांत मोकाटे आणि किशोर शिंदे यांचा तगड आव्हान असणार आहे.

कोथरूडने आत्तापर्यंत प्रत्येक वेळी नवीन चेहऱ्याला आमदार होण्याचा मान दिला आहे. चंद्रकांत पाटील हे राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव असलं तरीही कोथरूडच्या राजकारणात मात्र किशोर शिंदे हे नाव दोन दशकांपासून प्रचंड चर्चेत आहेत. थोडक्यात या ठिकाणची लढत ही चुरशीची होईल यात शंका नाही मात्र कोथरूडकर यावेळी पुन्हा गुलाल खेळण्याची संधी चंद्रकांत पाटलांनाच देणार ? की प्रथम आमदार मोकाटे हे बॅक लॉक भरून मताधिक्य मिळवणार ? की मग दोन वेळा थोडक्यात संधी हुकलेले किशोर शिंदे जायंट किलर ठरणार, याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!