मागील अनेक दिवसांपासून भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत असून अनेक मातब्बर नेते पक्ष सोडताना पाहायला मिळतायेत.
काहीच दिवसांपूर्वी भाजपातील कोल्हापूरचे महत्त्वाचे नेते समरजीतसिंहराजे घाडगे यांनी भाजपा सोडत तुतारी हाती घेतली तर अगदी दोनच दिवसांपूर्वी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली आहे.
अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र आणि विश्वासू अशी ओळख असणारे माजी राज्यसभा खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे देखील भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
10 ऑगस्ट 2024 ला शरद पवारांचं पुण्यातील निवासस्थान असणाऱ्या मोदीबागेत संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्याचवेळी संजय काकडे हे तुतारी फुंकतील अशा चर्चांना उधाण आलं होतं.
विजयादशमी नंतर संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोललं जात आहे.
शरद पवारांबरोबर गुप्त बैठका
संजय काकडे आणि शरद पवार यांच्यात दोन ते तीन गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकांमध्येच पक्षप्रवेशाविषयी चर्चा झाली असून काकड्यांचा पक्षप्रवेश हा 16 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पवारांचे 40 आमदार हे अजित पवारांबरोबर गेले. मात्र त्यानंतर यंदाच्या विधानसभेसाठी तब्बल 1600 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर भाजप सह इतर अनेक पक्षातील बडे नेते हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच शरद पवार गटात सुरू असलेल्या जोरदार इन्कमिंग मध्ये संजय काकडे यांचा सुद्धा समावेश होणार आहे.