8 विद्यमानांचा पत्ता कट; नव्या चेहऱ्यांवर भाजपने घेतली रिस्क

133 0

विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपली असून आता जवळपास सर्वच मतदारसंघांमधील लढती या स्पष्ट झाल्या आहेत. अनेकदा नव्या चेहऱ्यांना पसंती देणाऱ्या भाजपने पुणे शहरात कुठेही भाकरी फिरवली नाही. विजय झालेल्या आणि विजयी न झालेल्या उमेदवारांना देखील पुन्हा उमेदवारी देण्यात आली. एकंदरीत पाहता भाजपने राज्यात नवे प्रयोग करण्याची फारशी रिस्क घेतली नाही. त्यामुळेच केवळ आठ आमदारांची तिकीटं कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील उमेदवार “जैसे थे” असले तरी चिंचवड विधानसभा मतदार संघात मात्र भाजपने नवा प्रयोग केला आहे. तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत त्यांच्याच पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी त्या ठिकाणी विजय देखील मिळवला. मात्र तरीही विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे तिकीट कापून भाजपने त्यांचेच दिर आणि लक्ष्मण जगताप यांचे बंधू असलेल्या शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पुन्हा अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली असती तर शंकर जगताप यांच्या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता होती. हेच टाळण्यासाठी भाजपने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून त्यांचा दिराला उमेदवारी दिली.

कल्याण पूर्वमध्येही भाजपने अशीच खेळी खेळत विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. पुढे भाजपने बोरिवली विधानसभा मतदारसंघात देखील विद्यमान आमदार सुनील राणे यांना उमेदवारी नाकारून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. तर वाशिम विधानसभा मतदारसंघातही भाजपने भाकरी फिरवली. विद्यमान आमदार लखन मलिक यांना उमेदवारी नाकारून श्याम खोडे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.

आठ आमदारांचं कापलं तिकीट

आर्णी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. या ठिकाणी देखील भाजपने विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांना डावलून त्यांच्याऐवजी राजू तोडसम यांना उमेदवारी दिली आहे. तर आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलत विद्यमान आमदार दादाराव केचे यांचं तिकीट कापून त्यांच्या ऐवजी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातही अशीच खेळी भाजपने खेळली आहे. विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचं तिकीट कापून प्रवीण दटके यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र विशेष बाब म्हणजे प्रवीण दटके हे विधान परिषदेचे आमदार आहेत. तरीदेखील त्यांना उमेदवारी का देण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर उमरखेड मतदारसंघात देखील भाजपने विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांना धक्का दिला आहे. नामदेव सासने यांचे तिकीट कापून किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

विद्यमानांची नाराजी पत्करून भाजपने नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे. त्यामुळेच आता या नव्या चेहऱ्यांसमोर विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. भाजपने घेतलेली रिस्क भाजपला फायद्याची ठरणार की भाजपची ही नवी खेळी भाजपवरच उलटणार ? हे पाहण्यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबर ची वाट पहावी लागणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!