पुण्यात काँग्रेसच्या 41 जणांना व्हायचंय आमदार; खडकवासल्यातून लढायला कुणीच नाही तयार!

675 0

पुण्यातील 08 पैकी 07 विधानसभा मतदारसंघांतून काँग्रेसच्या तब्बल 41 इच्छुक उमेदवारांनी आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून मुलाखती दिल्या. त्यात काँग्रेसच्या एकमेव कसब्याच्या विद्यमान आमदारांसह 02 माजी राज्यमंत्री, 02 माजी महिला महापौर, आणि 07 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. एका मतदारसंघातून पिता-पुत्र तर अन्य एका मतदारसंघातून पती-पत्नी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, खडकवासला मतदारसंघातून एकही इच्छुक मुलाखत देण्यास पुढं आला नाही हे विशेष! त्यामुळं काँग्रेसकडून खडकवासल्याला ‘बाय’ देण्यात आलाय की काय अशी चर्चा आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.

खडकवासला वगळता 07 मतदारसंघांसाठी 41 जण इच्छुक

पुणे शहरात कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, खडकवासला आणि हडपसर असे एकूण 08 विधानसभा मतदारसंघ येतात. काँग्रेस भवनात माजी महिला व बालविकासमंत्री तसेच विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. 05 महिला आणि 36 पुरुष अशा एकूण 41 जणांनी आमदारकी लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, खडकवासला मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यास एकही इच्छुक उमेदवार काँग्रेस भवनची पायरी चढताना दिसला नाही.

कसब्यातून आ. धंगेकरांसह माजी महापौर कमल व्यवहारे इच्छुक

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून 02 महिला आणि 04 पुरुष असे एकूण 06 जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात विद्यमान आमदारांसह माजी महिला महापौरांचाही समावेश आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेले विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा कसब्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
2019 च्या निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून का होईना पण 1985 नंतर म्हणजे तब्बल 38 वर्षांनी काँग्रेसनं कसब्यावर कब्जा मिळवला. 1985 मध्ये काँग्रेसचे उल्हास काळोखे कसब्याचे आमदार बनले होते. त्यानंतर काँग्रेसच्या हातून कसबा निसटला आणि तो भाजपचा गड बनला. धंगेकर यांनी 2024 मध्ये पुण्याची लोकसभा देखील लढवली पण भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा 1, 23,038 मतांनी पराभव केला. आता आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास धंगेकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहात आहेत. पुण्याच्या पहिल्या महापौर बनलेल्या कमल व्यवहारे या देखील कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 1992 मध्ये त्या पुण्याच्या महापौर होत्या. सलग पाचवेळा पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या आहेत. कमल व्यवहारे यांनी प्रदेश काँग्रेस संघटनेत सरचिटणीस, उपाध्यक्ष, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महिलांसह नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून कायम सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी देखील कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 2023 च्या पोटनिवडणुकीवेळीच त्यांनी कसबा मतदारसंघावर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. आता मात्र ते पुन्हा एकदा कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या शिवाय पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख तसेच शिवानंद हुल्याळकर यांनीही कसब्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत मुलाखती दिल्या आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंटमधून बागवे पिता-पुत्र निवडणूक लढण्यास सज्ज

पुणे कॅन्टोन्मेंटमधून 02 महिला आणि 09 पुरुष असे एकूण 11 जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात एका माजी राज्यमंत्र्यांसह 03 माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून बागवे पिता-पुत्र दोघेही इच्छुक
आहेत. एकदा पर्वती तर एकदा पुणे कॅन्टोन्मेंट असे दोनदा आमदार राहिलेले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. बागवे यांनी पर्वतीमधून 1985 आणि 1995 मध्ये अपक्ष तर 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती पण तिन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये मात्र ते काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार बनले. पुढं 2009 मध्ये त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. आता ते पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंटमधून लढण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. अविनाश बागवे 2012 आणि 2017 असे दोन वेळा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. 2017 मध्ये शिवसेनेतून नगरसेवक झालेले अविनाश साळवे यांनी देखील पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 2012 आणि 2017 मध्ये नगरसेविका राहिलेल्या लता राजगुरू या देखील कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
या शिवाय छाया जाधव, मुकेश धिवार, भीमराव पाटोळे, राजाभाऊ भोसले, रवींद्र आरडे, सुजीत यादव आणि मिलिंद अहिरे यांनी देखील कॅन्टोन्मेंटमधून इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या.

पर्वतीमधून माजी उपमहापौर आबा बागुल लावणार जोर

पर्वती विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर आबा बागुल इच्छुक आहेत. रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना डावललं जातं, असं म्हणत याच आबा बागुलांनी काँग्रेस भवनच्या पायरीवर बसून मूक आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रचारादरम्यान धंगेकर यांनी स्वतः आबा बागुल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर बागुल यांनी घरातूनच मी धंगेकरांचा प्रचार करणार, असं म्हणत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मध्यंतरी, आबा बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा देखील रंगली होती. त्याच दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद दिलं आणि आबा विधानसभेच्या तयारीला लागले. आबा बागुल यांच्या व्यतिरिक्त पर्वतीमधून संभाजी जगताप आणि संतोष पाटोळे या दोघांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत.

हडपसरमधून माजी राज्यमंत्री शिवरकर पुन्हा लढण्याच्या तयारीत

हडपसरमधून माजी राज्यमंत्री आणि 03 वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब शिवरकर पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 1985 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा उभे राहिले पण त्यात त्यांचा पराभव झाला. 1990 मध्ये मात्र ते पहिल्यांदा आमदार बनले. 1995 मध्ये त्यांचा पुन्हा पराभव झाला. 1999 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. 2004 ची निवडणूक जिंकून त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक साधली. पुढं 2009 आणि 2014 मध्ये ते हडपसर मतदारसंघातून उभे राहिले पण दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. आता बाळासाहेब शिवरकर पुन्हा एकदा हडपसरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवरकर यांच्या व्यतिरिक्त हडपसरमधून सुदर्शन घेराडे आणि हाजी उस्मान तांबोळी या दोघांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत.

शिवाजीनगरमधून माजी महापौर दिप्ती चवधरी इच्छुक

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून 02 महिला आणि 10 पुरुष असे एकूण 12 जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
त्यात माजी महिला महापौरांचाही समावेश आहे. 2000 ते 2005 या कालावधीत पुण्याच्या महापौर राहिलेल्या दिप्ती चवधरी शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पुणे शहर काँग्रेसच्या सक्रिय महिला नेत्या म्हणून दीप्ती चवधरी यांची वेगळी ओळख आहे. 1997 आणि 2000 मध्ये त्या पुणे महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. 2010 मध्ये त्या काँग्रेसकडून विधान परिषदेच्या आमदार झाल्या. आता दीप्ती चवधरी शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक दत्तात्रेय बहिरट पुन्हा एकदा शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण देखील शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद आणि पूजा आनंद हे पती-पत्नी हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनीष आनंद तसेच त्यांच्या पत्नी पूजा आनंद या दोघांनीही इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या. खडकी कॅन्टोन्मेंटमधून नगरसेविका राहिलेल्या पूजा आनंद पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. या व्यतिरिक्त अनिल पवार, जावेद निलगर, कैलास गायकवाड, राज निकम, महेंद्र सावंत, रमेश पवळे आणि संजय अगरवाल यांनीही इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेले काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं या यादीत नावच नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील, रमेश सकट, राजू ठोंबरे, सुनील मलके आणि जोसेफ डिसूझा या 05 जणांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून संदीप मोकाटे या एकमेव उमेदवारानं निवडणूक लढवण्यास इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे.

खडकवासल्याचा वाली कोण?

2008 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन नव्यानं निर्मिती झालेल्या खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून कुणीही इच्छुक दिसत नाही. 2014 चा अपवाद वगळता काँग्रेसनं इथून एकही निवडणूक लढवली नाही. 2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी श्रीरंग चव्हाण यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2009 आणि 2019 मध्ये आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. खडकवासल्यावर भाजपचं वर्चस्व असल्यानं आणि ही जागा काँग्रेसला सुटणार नसल्यानं खडकवासल्यातून कुणी इच्छुक पुढं आला नसल्याचं सांगण्यात येतंय.

एकूणच काय तर 01 विद्यमान आमदार, 02 माजी राज्यमंत्री, 02 माजी महिला महापौर आणि 07 माजी नगरसेवक पुण्यातून आमदार व्हायला इच्छुक आहेत. खडकवासला वगळता 07 मतदारसंघांसाठी 41 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. म्हणजे यातील 07 जण वगळता 34 जणांना उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित! आता तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेले इच्छुक बंडखोरी करून अपक्ष उभे राहणार की तिकीटासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!