1972 च्या विधानसभा निवडणुकीची सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट कोणती होती माहितीये? नाही माहीत? सांगतो… या निवडणुकीत
एकही महिला उमेदवार निवडून आली नव्हती. त्यामुळं 1972 मध्ये स्थापन झालेल्या सरकारच्या बाबतीत एकमेव सरकार, विधानसभेत ‘शून्य’ महिला आमदार! असं म्हटलं जातं. चला तर मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात… ‘विधानसभा फास्ट फॉरवर्ड’ या विशेष मालिकेचा तिसरा भाग… किस्सा 72 चा
1972 च्या विधानसभा निवडणुकीत 270 जागांसाठी 1,141 पुरूष तर 56 महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निवडणुकीचा निकाल लागला खरा पण सर्व जागांवर पुरूष उमेदवार निवडून आले. 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर देशात 1971 ला सार्वत्रिक निवडणूक झाली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आला आणि 1972 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या. काँग्रेस (आर) आणि काँग्रेस (ओ) हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. रिपाइं, भारतीय जनसंघही मैदानात उतरले. इंदिरा गांधींची काँग्रेस आणि काँग्रेस (O) म्हणजेच जुनी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसह भारतीय जनसंघ, रिपाइं, शेकाप यांच्यात मुख्य लढती झाल्या. इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं 270 तर काँग्रेस (0) नं 49 जागा लढवल्या. भारतीय जनसंघानं 122 तर रिपाइंनं 118 जागा लढवल्या. शेकापनं 58 जागा लढवल्या. शिवसेनेनं देखील 26 जागा लढवल्या. एकूण 15 पक्ष आणि 343 अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले.
निवडणूक निकाल लागला पण सर्व जागांवर पुरूष उमेदवार निवडून आले. एकही महिला उमेदवार आमदार बनली नाही. इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं तब्बल 222 जागा जिंकल्या तर जुनी काँग्रेस भोपळा देखील फोडू शकली नाही. भारतीय जनसंघानं 05 जागा जिंकल्या तर रिपाइंनं 02 जागी विजय मिळवला. शेकापनं 07 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेनं देखील एक जागा जिंकली. गिरगाव मतदारसंघातून प्रमोद नवलकर विजयी झाले. या निवडणुकीत 11 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 04 पक्षांच्या हाती भोपळा आला.
इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. पुढं पक्षांतर्गत कलहापोटी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले मात्र त्यांच्याच काळात देशात आणीबाणी लागू झाली. त्यात ते पडले ‘इंदिरानिष्ठ’. त्यामुळं त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसले. या निवडणुकीत सत्तेत बसलेल्या पक्षाला मिळालेल्या जागा होत्या 222 तर त्या खालोखाल सर्वाधिक जागा मिळवलेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता शेकाप. अवघ्या 07 जागा मिळालेल्या शेकापला विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि दि. बा. पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
एकूणच काय तर 1972 च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार विधानसभेपर्यंत पोचू शकली नाही त्यामुळं हे सरकार हे शून्य महिला आमदार म्हणून ओळखलं गेलं.
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी