नागपूर : काँग्रेसमधील (Congress) निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नागपूर (Nagpur) जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे.
आशिष देशमुख यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आशिष देशमुखांना भाजपकडून सावनेर किंवा काटोलमधून मिळणार उमेदवारी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख (Ranjit Deshmukh) निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजीत देशमुख यांना मानणारा असून त्यामुळे आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिल्यास सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार देता येईल. तसेच दुसऱ्या बाजूला 2014 मध्ये काटोलमधून आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यास अनिल देशमुख यांची कोंडी करता येईल असा देखील भाजपचा प्लॅन आहे. त्यामुळे आता आशिष देशमुखांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.