महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नेमका राजकीय प्रवास कसा आहे पाहुयात..
4 मे 1968 रोजी मोहोळमध्ये जन्मलेल्या अण्णा बनसोडे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. 1997 आणि 2002 असे सलग दोन वेळा अण्णा बनसोडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले 2000 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष पदही बनसोडे यांनी भूषवलं आहे.
2009 मध्ये अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांच्याकडून 2,335 मतांनी अण्णा बनसोडे पराभूत झाले.
त्यानंतर 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे विजयी झाले. अजित पवारांचे विश्वासू अशी अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राजकुमार बडोले, अनिल पाटील, संजय बनसोडे आदी नाव चर्चेत असताना विधानसभा उपाध्यक्षपदाची माळ अण्णा बनसोडे यांच्या गळ्यात पडली आहे.