उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका ‘जय महाराष्ट्र’ खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती, असे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज पुन्हा अजित पवारांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत त्याच आशयाचे विधान केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या मुलाखतीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या मुलाखतीमध्ये बोलाताना अजित पवार म्हणाले की, ‘बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं करणं, ही चूक होती. त्यामुळे आमच्या कुटुंबातल्या इतरांना त्रास सहन करावा लागला. बारामती विधानसभेत लागलेल्या निकालाला मीच जबाबदार आहे.’ अजित पवारांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुढे मुलाखतीत अजित पवारांना, पुन्हा शरद पवारांकडे जाणार का हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ‘मी ३० ते ४० वर्षांपासून राजकारणात आहेत. मला माझे कार्यकर्ते चांगले ओळखतात. त्यांना माझा स्वभाव माहित आहे. आम्ही येणारी निवडणूक ही महायुतीकडून लढवणार असून स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी तयारीला लागलो आहोत.’ तर शरद पवारांकडून तुम्हाला थेट निमंत्रण नसले तरीही घर वापसीचे दरवाजे उघडे आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी ‘नो कमेंट्स’ इतकेच उत्तर दिले. त्यामुळे अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील की नकारात्मक भूमिका घेतील, याबाबत त्यांच्या उत्तरात स्पष्टता नव्हती.
अजित पवारांबाबत पक्ष निर्णय घेणार
असाच प्रश्न काही दिवसांपूर्वी शरद पवारांना देखील विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते, ‘त्यांच्याबाबत जो काही निर्णय असेल तो पक्षाचा असेल. पक्षच निर्णय घेईल.’ त्यामुळे आता भविष्यात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार गटाकडून पक्ष म्हणून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.