Kedar Dighe : शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले केदार दिघे कोण ? (VIDEO)

219 0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी त्यांच्याविरुद्ध बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळं चर्चेत आलेले हे केदार दिघे कोण आहेत ,पाहूयात…

केदार दिघे हे ठाण्याचे सर्वेसर्वा समजले जाणारे दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. केदार दिघे ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था चालवतात. केदार दिघे शिवसेनेसोबत जोडले गेले पण त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. केदार दिघे हे लहान असताना अनेकदा आनंद दिघेंसोबत कार्यक्रमात दिसून आले. केदार दिघेंनी वयाच्या 19 व्या वर्षी आनंद दिघेंच्या पार्थिवाला अग्नी दिला होता.

ठाणेकरांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं ते याचवेळी ! यापूर्वी केदार दिघे फारसे कोणालाच माहिती नव्हते. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर 2006 मध्ये केदार दिघेंनी राजकारणात प्रवेश केला. युवा नेते म्हणून ते शिवसेनेत दाखल झाले. ठाणे आणि पालघरमध्ये युवा सेनेअंतर्गत ते कार्यरत होते. 2013 मध्ये त्यांना युवासेनेचे निरीक्षक पद देण्यात आलं. त्यानंतर 2017 मध्ये युवासेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. “वयाच्या 38 व्या वर्षी युवासेनेत राहाणं चुकीच आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

काही वर्षांपूर्वी केदार दिघे अचानक चर्चेत आले. त्यांनी आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन आपला बॅनर लावला. त्यामुळे शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवसैनिक प्रचंड नाराज झाले होते. “शिवसेनेनं मला एक साधं पद दिलं नाही किंवा मुख्य प्रवाहातही सामावून घेतलं नाही, याची खंत केदार दिघे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली होती. केदार दिघे यांनी महिंद्रा, सीमेंस आणि टाटा एआयजी यांसारख्या खासगी कंपन्यांच्या विविध प्रोजेक्टवर काम केल्याची माहिती आनंद दिघे. कॉम या वेबसाईटवर देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. खासदार राजन विचारे सोडता सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणीच बोलत नव्हतं. त्यावेळी केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

“एकनाथ शिंदेंचं कृत्य आनंद दिघेंना कधीच आवडलं नसतं,” असं केदार दिघे यांनी म्हटलं. केदार दिघेंच्या मागे आनंद दिघे यांचं नाव आहे. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात ठाकरेंनी ‘दिघे ब्रॅंड’चा वापर केलाय. शिंदेंना काऊंटर करण्यासाठी केदार यांना उद्धव यांनी पुढे केलंय,” असं राजकीय विश्लेषक सांगतात.

केदार दिघेंना जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करून त्यांना ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि ठाण्याची जबाबदारी देण्यात आलीये.
जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर तीनच दिवसांत केदार दिघे वादात सापडले. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर बलात्कार आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला. 23 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ठाण्यात शिवसेना आता नाममात्र उरलीये. त्यामुळे केदार दिघे यांचा फारसा फायदा शिवसेनेला होईल की नाही याबाबत साशंकता असली तरी पुन्हा एकदा शिवसेनेला ठाण्यात उभारी घ्यायची असेल तर केदार दिघे यांना आपलं संघटनात्मक कौशल्य दाखवून द्यावं लागेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!