राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका हा महायुतीला बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 खासदार निवडून आलेल्या भाजपाला 2024 च्या निवडणुकीत केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी आता भाजपा रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला. पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्रात पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत जनतेने मला नाकारलं आहे त्यामुळे मला विधानसभा विधानपरिषद आणि राज्यसभा ही नको अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी घेतल्याचे सांगितलं जातंय. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांना विचारणा करण्यात आली होती परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. राज्यातील मराठा समाजासह मोठं नेतृत्व असणारा रावसाहेब दानवे यांचं राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे आहे त्यामुळे भाजपमधून त्यांना राज्यसभेवर संधी दिल्या जाऊ शकते, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा पक्षाला होईल आणि त्याचबरोबर मराठा मतदारांना आकर्षित करण्याची आणि मराठा समाजाचा भारतीय जनता पक्षाबद्दल असलेला रोष कमी करण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.