येत्या 10 तारखेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं पहिलं स्थान आहे आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. त्यामुळे चारशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराला समृध्द अशी परंपरा आहे. तर आज आपण या मंदिराचे महत्व आणि त्याची आख्यायिका जाणून घेणार आहोत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा पहिला विसावा असतो. आकुर्डीतील हे मंदिर परंपरेने कुटे कुटुंबाकडे आले आहे. वारी दरम्यान संत तुकाराम महाराज या ठिकाणी मुक्काम करत. त्यामुळे तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी शेती होती. मंदिराच्या चारही बाजूने घडीव दगडांची भिंत आहे. मंदिराचे जुने लाकडी प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. जुन्या काळात पाषाणात घडवलेली विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रसन्न मूर्ती दगडी महिरपीत आहेत. या प्राचीन मंदिरांच्या बाबतीत एक आख्यायिकाही प्रचलित आहे. तर ही आख्यायिका काय आहे चला पाहूया…
एकदा श्री संत तुकाराम महाराज पंढरीच्या वारीसाठी देहूगावातून निघाले होते. यादरम्यान आकुर्डी गावाजवळ येताच त्यांच्या पोटात दुखू लागले. असह्य वेदनांनी ते हतबल झाले. यावेळी घरगुती उपचारांनंतरही त्यांच्या वेदना थांबल्या नाहीत. त्यामुळे यंदा वारी चुकते की काय असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरले. त्यानंतर तुकाराम महाराजांची पोटदुखी कमी झाली. त्याच ठिकाणी आजचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले, अशी आख्यायिका आहे. यामुळे पालखीच्या मुक्कामाचा पहिला मान आकुर्डीला मिळतो. या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता तसेच पाण्याची व्यवस्था केली जाते.