छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत. सर्व ठिकाणचे थिएटर्स फुल आहेत. चित्रपटातील डायलॉग्स आणि सीन्स प्रेक्षकांना प्रचंड भावले आहेत. चाहते विकी कौशल वर कौतुकाचा वर्षाव करत आहे. या सिनेमाची सगळीकडेच चर्चा असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरू असलेला धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजलं नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी या ठिकाणच्या गणेश थिएटर मधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत नेमका काय प्रकार दिसून येत आहे पाहूयात.
या व्हिडीओत काही लोक थिएटरमध्ये छावा हा चित्रपट सुरू असताना आरामात मद्य प्राशन करताना दिसतायत. यावेळी त्यांना एका प्रेक्षकाने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत जाब विचारला, ज्यावर त्याला उत्तर देण्यात आले की, मी काय आवाज करतोय का? पण एका महापुरुषाचा चित्रपट समोर सुरू असताना अशा प्रकारचं धक्कादायक कृत्य करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तसेच थिएटरमध्ये मद्याची बाटली नेण्यास परवानगी मिळाली कशी असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका थिएटरमध्ये छावा हा चित्रपट सुरू आहे. यावेळी थिएटरच्या अगदी मागच्या बाजूच्या आसनांवर काही लोक बीअरची बाटली आणि बाजूला पाणी अन् चण्याचे पॅकेट ठेवून आरामात मद्य प्राशन करतायत. यावेळी त्यांच्या पुढच्या आसनांवरील काही प्रेक्षकांनी त्यांना मागे वळून काय प्रकार सुरू आहे, असा प्रश्न केला. यावेळी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीने मी काय आवाज करतोय का, गोंधळ घातलोय का, असे उत्तर दिले. त्यावर इतर प्रेक्षकांनी मद्य प्राशन करणाऱ्यांना तुमचा सुरू असलेला प्रकार बंद करा, असे त्यांना बजावले.थिएटरमधील हा व्हिडीओ @kartik_salunkhe_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यातील काही प्रेक्षकांचं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.