आरक्षण विषयावर सर्व जाती आक्रमक होताना सध्या अनेक जण आपल्या जातीचा उल्लेख आमचा समाज असा करत असतात.आमच्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे बोलत असतात..माध्यमे ही हमखास प्रत्येक जातीला समाज म्हणतात.. आम्ही विशिष्ट जातीचे असे म्हणताना लाज वाटते त्यामुळे जातीला लोक समाज म्हणतात…
हे आपण नोंदवू या की
जातीला समाज म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. अनेक शतकांतील समाजसुधारक आणि स्वातंत्र्य आंदोलनाने त्याग व संघर्ष करून आपण टोळीपासून समाजापर्यंत प्रवास केला आहे… सर्व जाती धर्म मिळून जात निरपेक्ष धर्मनिरपेक्ष जो बनतो त्या समूहाला आपण समाज हे नाव दिले आहे. जर जातींनाच आपण समाज म्हणणार असू तर मग सर्व जातींनी मिळून बनलेल्या समाजाला काय नाव द्यायचे हा प्रश्न आहे ?
जातीला ‘समाज’ असे म्हणून जातीच्या संकुचितपणाला प्रतिष्ठा देण्याचा एक सुप्त प्रयत्नही यात असतो. जात ही अत्यंत क्षुद्र व प्रतिगामी गोष्ट आहे व माणसांचा जातीचा चेहरा नसलेला समाज निर्माण करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केलेले आहेत. जातींची बंधने गळून पडतात त्यातून समाज नावाची एकसंघ वाटणारी भावावस्था आपली बनते.
तेव्हा जातींचे उल्लेख जात म्हणूनच करून त्याच्या संकुचितपणाचे जाणीव करून द्यायला हवी त्याचे समाज म्हणून अजिबात उदात्तीकरण होता कामा नये…. समाज ही उन्नत स्थिती आहे
संविधानाने आपल्याला वेगवेगळी संस्थाने, राज्य, जात धर्म ओलांडून एक भारतीय म्हणून ओळख दिली आहे.एकसंघ समाज बनवले आहे. ती आपण टिकवली पाहिजे. हे वस्त्र टिकायला हवे. त्यामुळे जातीचे समाज म्हणून उदात्तीकरण करू नका.
माध्यमांनीही जातीचा उल्लेख समाज म्हणून करू नये.
हेरंब कुलकर्णी
– सामाजिक कार्यकर्ते