सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन थाटात साजरा
पुणे- आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा, अधिसभा सदस्य आणि सर्व अधिष्ठाता तसेच जीवनसाधना व युवा गौरव पुरस्काराचे मानकरी आदी मंचावर उपस्थित होते.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, मौखिक संवाद ते डिजिटल संवादाच्या प्रवासात लेखन परंपरा आली. मात्र ही लेखन परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नात आपण चित्रसंवाद, ध्वनी संवाद, संवेदना दुसऱ्या भाषा मागे टाकल्या. मात्र औपचारिक शिक्षणात या सर्व भाषांचा समावेश होणे गरजेचे आहे.
डॉ.करमळकर म्हणाले, “जवळपास ५२ विभागांचा समावेश असणाऱ्या १७ प्रशाला विद्यापीठ परिसंस्थेत सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यापीठाने अनेक उपक्रम सुरू केले आहे. मागील पाच वर्षातील धोरणात्मक निर्णयाने विद्यापीठ भविष्यात मोठी उंची गाठेल” असा विश्वासही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारती ठाकूर, आयुर्वेद विषयात काम असणारे डॉ. सदानंद सरदेशमुख, शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.मो.स.गोसावी, शैक्षणिक व सामाजिक कामात नावलौकिक मिळवलेले डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती देशमुख, सामाजिक व सहकार क्षेत्रातील रमेश आप्पा थोरात, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रमोद कांबळे, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रातील कलाकार व सुप्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख आदींना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या युवा गौरव पुरस्कारांमध्ये विनायक लष्कर यांना सामाजिक कार्यासाठी, लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना साहित्य क्षेत्रातील, कला क्षेत्रात चिंतन उपाध्याय तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले तर आभार डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले.