गौरवास्पद ! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार

417 0

पुणे- स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व सुजाण नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. प्रथमच शाळेच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार ठेवण्यात आला आहे.

या शाळेतून 1959 साली दहावी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी, ‘डाॅ. अनिल नारायण खारकर यांना अमेरिकेतील ‘काॅर्निंग’ या उद्योगसमूहाकडून अनोख्या पद्धतीने गौरवण्यात आले. या कंपनीने ‘ANIL KHARKAR PROCESS ENGINEERING EXCELLENCE AWARD’ असा डाॅ. खारकर यांच्या नावाने पुरस्कार ठेवला. या पुरस्काराचे वितरण 9 मे 2022 रोजी करण्यात आले. दरवर्षी हा पुरस्कार कंपनीतील सर्वोत्तम कर्मचाऱ्यास अत्यंत पारदर्शक नियमावलीच्या आधारे निवड करून देण्यात येईल.

डाॅ. खारकर यांची समर्पणवृत्ती, परिश्रम, दूरदृष्टी, उच्च प्रतीचे तांत्रिक ज्ञान यांचा उपयोग करून त्यांनी गेल्या 50 वर्षांत निवृत्तीनंतरही 12 देशातील, कंपनीच्या 4000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यासाठी कंपनीने त्यांचा नावाने पुरस्कार ठेवून त्यांचा केलेला बहुमान प्रशालेसाठी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीसाठी आणि देशासाठीही अतिशय अभिमानाची घटना आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूलचे शालासमिती अध्यक्ष खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका दर्शना कोरके शाळेचे इतर पदाधिकारी या सर्वांच्या वतीने डाॅ. अनिल खारकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

यापूर्वीही शाळेच्या अनेक माजी विदयार्थ्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. पण शाळेच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत एखादा पुरस्कार ठेवला जाण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!