संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. तथापि, आपल्या अजरामर गाण्यांमुळे त्या सदैव आपल्यासोबत असतील, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
पाटील म्हणाले की, दैवी सुरांमुळे आणि अलौकिक गायनामुळे लता मंगेशकर यांना देशातील घराघरात आणि मनामनात स्थान मिळाले आहे. आयुष्यातील सुखदुःखाच्या अशा दोन्ही प्रसंगात लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी मनाला साद देतात. महान गायिका असण्यासोबतच त्या तितक्याच देशभक्त होत्या. त्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान होता.