नुकताच रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने या चित्रपटात जयेशभाई ही भूमिका साकारली आहे.
चित्रपटात रणवीरच्या पत्नीची भूमिका ही अभिनेत्री शालिनी पांडे साकारत आहे. तर जयेशभाईच्या वडिलांची भूमिका ही बोमन इराणी आणि आईची भूमिका ही रत्ना पाठक शाह साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केले आहे.
जयेश ही भूमिका समाजावर असलेल्या पितृसत्ताक दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. त्याच्या कुटुंबात एक मुलगा असलाच पाहिजे असा अट्टाहास असतो. पण त्याला मुलगा होत नसल्याने त्याच्या घरचे दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरतात. या सगळ्यात जयेशभाई समाजाच्या विरोधात जातो. तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत पळून जातो. आता तो यात यशस्वी होईल की सामाजिक नियमांना बळी पडेल? हा प्रश्न ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला आहे.
रणवीर सिंग त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. तो कोणतीही भूमिका साकारू शकतो हे प्रत्येकवेळी रणवीर दाखवून देतो. त्यात आता जयेशभाई जोरदारचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद शिगेला पोहोचला आहे.जयेशभाई जोरदार या चित्रपटाचा ट्रेलर हा २ मिनिटे ५७ सेकंदाचा आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.