नवी दिल्ली- भारताच्या शत्रूंची झोप उडवण्यासाठी देशाची सागरी सीमा अभेद्य आणि अखंड ठेवणारी आतापर्यंतची सर्वात आधुनिक पाणबुडी INS वागशीर लवकरच भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. काय आहे या पाणबुडीची खासियत आणि तिला का म्हणतात सायलेंट किलर, जाणून घ्या सविस्तर
पाणबुडीची रचना कशी आहे ?
प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधलेली ही पाणबुडी कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी आहे. ही कलवरी वर्गाची डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. या पाणबुडीची लांबी सुमारे 221 फूट असून तिची उंची सुमारे 40 फूट आहे. या पाणबुडीमध्ये 360 बॅटरी सेल आहेत. मुंबईतील मांढगाव डॉक येथे बांधण्यात आलेल्या या पाणबुडीपैकी 40 टक्क्यांहून अधिक पाणबुडी आत्मनिर्भर भारत अंतर्गत बांधण्यात आली आहे.
पाणबुडीचा वेग किती आहे ?
पाण्याच्या पृष्ठभागावर ही पाणबुडी ताशी 20 किमी वेगाने फिरते, तर पाण्याखालील या सायलेंट किलरचा वेग ताशी 37 किमी आहे. ही पाणबुडी समुद्राच्या तळात 350 फूट खोलीवर जाऊन शत्रूचा शोध घेऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पाणबुडी समुद्रात सुमारे ५० दिवस शांतपणे अॅम्बशमध्ये राहू शकते. या पाणबुड्यांची श्रेणी त्यांच्या वेगानुसार ठरवली जाते.
INS वागशीर कोणत्या घातक शस्त्रांनी सुसज्ज आहे ?
शत्रूंचा नायनाट करण्यासाठी या पाणबुडीमध्ये प्राणघातक शस्त्रे बसवण्यात आली आहेत. या पाणबुडीमध्ये 533 मिमीच्या 6 टॉर्पेडो ट्यूब आहेत. कोणत्याही मोठ्या ऑपरेशन दरम्यान, हे सायलेंट किलर 18 टॉर्पेडो किंवा SM39 अँटी-शीप मिसाईल सोबत घेऊन जाऊ शकते. शत्रूच्या पाणबुड्या, युद्धनौका नष्ट करण्यासाठी समुद्रात खाणी टाकण्याची क्षमताही वाघशीरमध्ये आहे. आयएनएस वागशीर एकाच वेळी सुमारे ३० खाणी टाकू शकते.
याला सायलेंट किलर का म्हणतात ?
प्रगत प्रणालीमुळे ही किलर पाणबुडी आवाज न करता समुद्रात फिरते. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे ती शत्रूंच्या रडारवर येत नाही. या पाणबुडीमध्ये दोन प्रगत पेरिस्कोपही बसवण्यात आले आहेत. आधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टीमसह सुसज्ज, INS वागशीर कोणत्याही हवामानात कार्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
वागशीर कोणत्या मिशनवर पोहोचू शकेल ?
आयएनएस वागशीरमध्ये सर्व प्रकारच्या मोहिमा पार पाडण्यात प्रवीणता आहे. विशेषत: पाणबुडीविरोधी युद्ध, भूपृष्ठविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, सुरुंग पेरणे यांमध्ये वागशीरला तोड नाही. इतर नौदल युद्धनौकांशी संवाद साधण्यासाठी या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा बसवण्यात आली आहे.
पाणबुडीतील सैनिकांचे आयुष्य कसे असते?
या पाणबुडीमध्ये एकावेळी 6 अधिकारी आणि 35 खलाशी तैनात केले जाऊ शकतात. या पाणबुडीमध्ये कामाचे तास ठरलेले असतात. प्रत्येक जवान आणि अधिकारी 3 तास ड्युटी करतो आणि नंतर 6 तासांचा ब्रेक घेतो. बाकी शिपाई आणि अधिकाऱ्यांसाठी छोटे कंपार्टमेंट आहेत. पाणबुडीमध्ये जागा कमी असल्याने अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाणबुडीतील स्वयंपाकघराला गॅली म्हणतात.
INS वागशीर 20 एप्रिल रोजी देशाच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यानंतर वर्षभर या पाणबुडीची सागरी चाचणी केली जाणार आहे. मार्च 2024 पर्यंत ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पाणबुडीच्या युद्ध ताफ्यात सामील झाल्याने सागरी सीमेची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.