विशेष संपादकीय:राजकीय रंगमंचावरील सत्तानाट्य!…आणि मोठ्या भावाच्या भूमिकेत…

4135 0

राजकीय रंगमंचावर बहुपात्री सत्तानाट्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडायचा असल्यास कधी कधी मोठ्या भावाला लहान भावाचं तर कधी लहान भावाला मोठ्या भावाचं पात्र वठवावं लागतं. नाटकावर पडदा पडला की, रंगमंचावर साकारलेली भूमिका जशी कलाकारानं तिथल्या तिथं सोडून द्यायची असते अगदी त्याचप्रमाणे राजकीय रंगमंचावरील सत्तानाट्याचा प्रयोग संपला की, आपल्या वास्तव रूपात शिरायचे असते. पण, जेव्हा एखादा कलाकार आपल्या वास्तव जीवनातही ती नाटकातली भूमिका जगायला लागतो तेव्हा जो काही गोंधळ उडतो अगदी तसाच काहीसा गोंधळ राजकीय रंगमंचावर पार पडलेल्या सत्तानाट्याच्या प्रयोगानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतो आहे.

महाराष्ट्राचे सत्तानाट्य : अंक पहिला
(28 नोव्हेंबर 2019 – 30 जून 2022)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळूनही 2014 ते 2019 अशी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीसांना बहुमता अभावी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका निभवावी लागली.
………………..
महाराष्ट्राचे सत्तानाट्य : अंक दुसरा
(30 जून 2022 – 26 जून 2024)
मोठा भाऊ असूनही लहान भावाच्या भूमिकेत -(देवेंद्र फडणवीस)
लहान भाऊ असूनही मोठ्या भावाच्या भूमिकेत – (एकनाथ शिंदे)
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळूनही युतीनं फडणवीसांना लहान भावाची म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची भूमिका स्वीकारायला सांगत 40 आमदार सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंना मोठ्या भावाची भूमिका दिली. दोघांनीही आपापली भूमिका चोख बजावली.
…………
महाराष्ट्राचे सत्तानाट्य : अंक तिसरा
26 नोव्हेंबर 2024

मोठा भाऊ लहान भावाच्या भूमिकेतून बाहेर – (देवेंद्र फडणवीस)
लहान भाऊ अजूनही मोठ्या भावाच्या भूमिकेत – (एकनाथ शिंदे)
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्यानं महायुतीनं फडणवीसांना मोठा भाऊ म्हणून भूमिका करायला सांगितली खरी पण तिकडं मूळचे लहान भाऊ असलेले एकनाथ शिंदे यापूर्वी निभावलेली मोठ्या भावाची भूमिका सोडायला तयार झालेले दिसत नाहीत.
…………….
नाटकावर पडदा पडायची वेळ आली तरीही…

वास्तविक पाहाता,’महायुतीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमतानाच्या प्रक्रियेत आपण आणि आपला पक्ष अडसर ठरणार नाही,’ असं दस्तुरखुद्द काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतरही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर अद्याप गुलदस्तात आहे. सत्तानाट्याचा वग झाला, गवळण झाली, प्रयोगाच्या दोन घंटाही वाजल्या; आता नाटकावर पडदा पडण्याची वेळ आली तरीही या राजकीय नाटकाचा ‘नायक’ कोण हे जनतेला कळेना झालंय. रंगमंचापेक्षा पडद्यामागच्या हालचालींना वेग आलाय. सत्तानाट्याचं रूपांतर नाराजीनाट्यात होतंय की काय अशी शंका येऊ लागली आहे. अमुक-तमुक ‘कलाकार’ आपल्या नाटकात नकोत, असा सूर मोठ्या भावाच्या कंपूतून आळवला जातोय तर मोठा भाऊ खुशाल व्हा पण एकावेळी एकच भूमिका करा, असा सूर अजूनही लहान भाऊ म्हणून मानायला तयार होत नसलेल्या कंपूतून चढवला जातोय.
आता या नाटकाचा प्रयोग सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी ज्या सूत्रधारावर आहे तो कशी सूत्रं हलवणार यावर या नाटकाचा शेवट गोड होणार की कडू हे ठरणार आहे. एकूणच पडद्यामागं होत असलेल्या हालचाली पाहाता या नाटकाच्या सूत्रधारानं मधेच प्रवेश करून ‘दिल थाम के बैठीये मेहरबान, नाटक अभी बाकी है’, असं म्हणू नये म्हणजे झालं!

संदीप चव्हाण वृत्तसंपादक TOP NEWS मराठी

Share This News
error: Content is protected !!