अन्यतुमच्यासाठी खास

हनुमान चालीसा : मराठी

मशिदींवरील भोंगे आणि त्या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा… या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय पण या गोष्टीमुळं आज सर्वांच्या कानी हनुमान चालिसा पडू लागलीये. काही राजकीय नेतेमंडळी तर भर सभेत किंवा पत्रकार परिषदेतच हनुमान चालीसा म्हणून दाखवू लागली आहेत. हनुमान चालिसा 16 व्या शतकात लिहिली. श्रीरामरचितमानसचे प्रसिद्ध रचनाकार संत तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहिली. हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं मूळ लेखन करण्यात आलंय. हनुमान चालिसात एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत पण त्यांचा मराठी अर्थ देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हनुमान चालीसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई येतात. ऐकूयात, हनुमान चालीसाचा अर्थ आपल्या मराठी भाषेतून…

1. जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

श्री हनुमान जी, आपला विजय असो. आपलं ज्ञान आणि गुण अथांग आहेत. हे कपीश्वर, आपला जय असो. तिन्ही लोक अर्थात, स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोकात आपली कीर्ती आहे.

2. रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

हे पवनसुत अंजनीनंदन, आपल्यासारखे बलशाली दुसरे
कुणीही नाही.

3. महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।

हे महावीर बजरंग बली, आपल्यामध्ये विशेष पराक्रम आहेत. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात.

4. कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।

आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्रे, कानात कुंडल आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात.

5. हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।

आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे तर खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे.

6. संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।

शंकराचे अवतार ! हे केसरीनंदन, आपल्या पराक्रमाची आणि महान यशाची साऱ्या जगभरात वंदना होते.

7. विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।

आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात, गुणवान आणि अत्यंत कार्यकुशलतेने आपण प्रभू श्रीरामाचे कार्य करण्यास सदैव उत्सुक असता.

8. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।

आपण श्रीराम चरित्र ऐकण्यात रस घेता, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आपल्या हृदयी वास करतात.

9. सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।

आपण आपलं सूक्ष्म रूप धारण करून त्याचं सीतेला दर्शन घडवलं आणि भयावह रूप धारण करून लंकादहन केलं.

10. भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।

आपण विक्राळ रूप धारण करून राक्षसांचा वध केलात आणि
प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्यास यश मिळवून दिलंत.

11. लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।

आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवलेत
त्यानं आनंदित होऊन प्रभू श्रीरामांनी आपणास हृदयाशी धरलं.

12. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।

प्रभू श्रीरामचंद्रांनी आपली खूप स्तुती केली आणि तुम्ही मला माझ्या भरतासारखे आहात, असं म्हटलं.

13. सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।

तुमचं यश हे हजारो मुखांनी गाण्यासारखं आहे, असं म्हणत प्रभू श्रीरामांनी आपणास हृदयाशी कवटाळलं.

14. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।

श्री सनक, श्री सनातन, श्री सनंदन, श्री सनत्कुमार आदी मुनी ब्रह्मा आदी देवता, नारद, सरस्वती, शेषनाग सर्व जण आपले गुणगान करतात.

15. जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।

यमराज, कुबेर तसेच इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा इतर कुणीही आपल्या यशाचं संपूर्ण वर्णन करू शकत नाही.

16. तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।

आपण प्रभू श्रीरामाशी सुग्रीवाची भेट घालून देऊन थोर उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले.

17. तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।

आपल्या उपदेशांचं बिभीषणाने पालन केले त्यामुळे ते लंकेचे राजा झाले हे साऱ्या जगाला ठाऊक आहे.

18. जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।

सूर्य इतक्या दूर अंतरावर आहे की तिथे पोचण्यास हजारो युगे लागतात. अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर असलेल्या सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून टाकलंत.

19. प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।

आपण प्रभू श्रीरामचंद्राची अंगठी मुखात ठेवून समुद्रापार गेलात यात आश्चर्य करण्यासारखं काहीही नाही.

20. दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।

या संसारसागरात कितीही अवघड कार्य असो ते आपल्या कृपेने सोपे होऊन जाते.

21. राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।

प्रभू श्रीरामचंद्राच्या द्वारावरचे आपण रखवालदार आहात, आपल्या आज्ञेशिवाय कुणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही. अर्थात, आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय प्रभू श्रीरामाची कृपा होणे अशक्य आहे.

22. सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।

आपणास शरण आलेला प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण त्याचे रक्षणकर्ते आहात म्हटल्यावर त्याला कुठलीही भीती राहात नाही.

23. आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।

आपल्याशिवाय आपला वेग कुणीही थांबवू शकत नाही, आपल्या केवळ गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात.

24. भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।

जिथे महावीर हनुमानाचे नाव घेतले जाते तिथे भूत-पिशाच्च जवळ देखील फिरकत नाही.

25. नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।

हे वीर हनुमान ! आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व दुःखं नाहीशी होतात.

26. संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

विचार, कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असते त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करता.

27. सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।

तपस्वी राजा प्रभू श्रीराम सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपे केले आहे.

28. और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।

ज्यांच्यावर आपली कृपा होते त्यांच्या इच्छेला अमर्याद फलप्राप्ती होते.

29. चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।

चारही युगांमध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगात आपले यश पसरले आहे, साऱ्या जगात आपली कीर्ती प्रकाशमान आहे.

30. साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।

प्रभू श्रीरामाचे लाडके ! आपन सज्जनांचे रक्षण करता आणि दुर्जनांचा विनाश करता.

31.अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।

आपल्याला देवी जानकीमातेकडून असे वरदान लाभले आहे की, आपण कुणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता.

32. राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।

आपण निरंतर श्री रघुनाथाला शरण आहात, ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजाराचा नाश करण्यासाठी रामनाम औषध आहे.

33. तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।

आपलं भजन केल्याने प्रभू श्रीरामाची प्राप्ती होते आणि जन्म-जन्मांतराची दुःखं दूर होतात.

34. अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।

आपणास शरण जावूनच अंतकाळी प्रभू श्रीराम धाम अर्थात वैकुंठाला जाता येऊ शकते आणि तिथे जन्म हरिभक्ताच्या रुपात मिळतो.

35. और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।

हे हनुमान ! आपली सेवा केल्याने सर्व प्रकारची सुखं प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज भासत नाहीत.

36. संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

हे वीर हनुमान ! आपले स्मरण केल्याने सर्व संकटं आणि वेदना नाहीशा होतात.

37. जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।

हे स्वामी हनुमान ! आपला जय असो, जय असो, जय असो आपली माझ्यावर कृपा असावी.

38. जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।

शंभर वेळा हनुमान चालीसा पठण केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल.

39. जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।

भगवान शंकर साक्षीला आहेत, हनुमान चालीसा पठण केल्याने
सर्व मनोकामना पूर्ण होऊन निश्चित यश प्राप्ती होईल.

40. तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।

हे नाथ हनुमान ! तुलसीदास सदैव प्रभू श्रीरामाचा दास आहे. म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा.

संत तुलसीदास, हनुमान चालीसाच्या शेवटी असं म्हणतात,

पवन तनय संकट हरन,
मंगल मूरति रूप।

राम लखन सीता सहित,
हृदय बसहु सुर भूप।।

हे संकट मोचन पवन कुमार ! आपण आनंद मंगल स्वरूप आहात. हे देवराज ! आपण प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे, हीच इच्छा ! जय श्रीराम ! जय हनुमान !!