पुणे- पुणे येथील आर्किटेक्चर क्षेत्रातील फोर्थ डायमेन्शन ग्रुप मधील फोर्थ डायमेन्शन आर्किटेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत कंपनीने नुकतीच रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण केली. या निमित्त आयोजित केलेल्या खास समारंभाला शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिम्बायोसिस संस्थेच्या विश्वभवन हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक नितीन वाघमारे, संचालिका अपर्णा वाघमारे, अनुपमा नंदूरबारकर, संचालक विकास वाघमारे, सतीश कोल्हेकर, प्रशांत वाघमारे, अमोल वाघमारे तसेच विविध विभागांचे प्रमुख, कंपनीचे मान्यवर क्लायंटस्, कर्मचारी, माजी कर्मचारी व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे मान्यवर क्लायंटस्, रामोजी फिल्म सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जालनापूरकर, मराठवाडा आर्किटेक्चर कॉलेजचे निवृत्त प्राचार्य श्री. रणजीत घोगले प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, शापूरजी पालनजी कंपनीचे अहलुवालिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजीव जालनापूरकर यांनी फोर्थ डायमेन्शन ग्रुपचे वॉटर थीमपार्क व अॅम्युझमेंट पार्क क्षेत्रात भरीव कामगिरी करत असल्याबद्दल विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी नितीन वाघमारे यांची मुलाखत घेतली. आपल्या छोटेखानी मुलाखतीमध्ये नितीन वाघमारे यांनी फोर्थ डायमेन्शन ग्रुपच्या आजपर्यंतच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच कंपनीला मिळालेल्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात कंपनीच्या कर्मचा-यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिध्द व्याख्याते ‘गप्पाष्टक’कार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मन करा रे प्रसन्न या विषयावर उद्बोधक व्याख्यान सादर केले. मन अप्रसन्न होण्याची कारणे तसेच मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे या विषयी त्यांनी दिलखुलासपणे विचार व्यक्त केले.
यावेळी नितीन वाघमारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले. लवकरच शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करुन त्यात शैक्षणिक ऍप विकसित करणार असून विद्यार्थ्यांसाठी करिअर कन्सल्टन्सी प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या माध्यमातून विविध शाखेतील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणार असल्याचे ते म्हणाले.
कंपनीमध्ये दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नितीन वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांनी नाटक, नृत्य, कंपनीची २५ वर्षांची वाटचाल उलगडून दाखविणारा सांगीतिक कार्यक्रम, फॅशन शो असे विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी an odyssey through the fourth dimension या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुप्रिया पटवर्धन व निधी शंड यांनी कार्यक्रमाचे यथायोग्य सूत्रसंचालन केले व वंदना चड्ढा यांनी आभार प्रदर्शन केले.