राज्यात विधानसभा निवडणुकीच वातावरण चांगलंच तापलं आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासने यावेळेस विविध ऑफर्स ठेवल्या आहेत.हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायकांनी ग्राहकांसाठी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. अशातच आता मराठी रंगभूमीवरील ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाने ही या उपक्रमात सहभाग घेऊन एक खास ऑफर आणली आहे.
रौप्य महोत्सवी प्रयोगासह विशेष ऑफर
‘पाहिले न मी तुला’ हे नाटक अल्पावधीतच लोकप्रिय ठरलं आहे. उत्कृष्ट कथानक, ताकदीचा अभिनय, आणि तांत्रिक गुणवत्ता यामुळे हे नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. मतदानाचा दिवस आणि महोत्सवी प्रयोग एकत्र येत असल्याने नाटकाचे निर्माते सुमुख चित्र आणि अनामिका यांनी ही खास ऑफर जाहीर केली आहे.
काय आहे ऑफर?
मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाच्या निर्मात्यांनी नाट्यप्रेमींसाठी खास ऑफर आणली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करून आल्यावर मतदानाचा शाईचा ठसा दाखवा आणि या नाटकाच्या तिकिटावर थेट ५०% सूट मिळवा! मतदान केल्याचा शाईचा ठसा तुम्ही तिकीट काउंटरवर दाखवा आणि सवलत मिळवा. ही ऑफर फक्त ऑफलाइन असणार आहे.
“मतदान करा, आणि मनोरंजनाचा हक्कही एन्जॉय करा,” असं आवाहन नाटकातल्या प्रमुख कलाकारांनी केलं आहे. या नाटकात अंशुमन विचारे, हेमंत पाटील, आणि सुवेधा देसाई मुख्य भूमिकेत आहेत.
लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘पाहिले न मी तुला’ हे नाटक नातेसंबंधांवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणार आहे.