‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता छोट्या पडद्यावरून थेट मोठ्या पडद्यावर झेप घेत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट ‘झापुक झुपूक’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः या चित्रपटाचं टायटल गाणं, ज्यामध्ये सूरजचा एनर्जेटिक आणि धमाल डान्स पाहायला मिळतो, ते सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य केले असून, त्याचं संगीत, बोल आणि सादरीकरण यामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत.
‘झापुक झुपूक’ या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील हटके फ्युजन. डीजे क्रेटेक्सने संगीत दिलेलं हे गाणं, पारंपरिक मराठमोळ्या ठसक्याला आधुनिक हिप-हॉप बीट्सची झालर लावून सादर केलं आहे. यापूर्वी ‘तांबडी चामडी’सारख्या लोकप्रिय गाण्याने धमाका केलेल्या क्रेटेक्सने पुन्हा एकदा आपल्या शैलीत भन्नाट कामगिरी केली आहे. गायक द डॉक यांच्या दमदार आवाजात आणि प्रतीक संजय बोरकर यांच्या हटके शब्दांत गुंफलेलं हे गाणं युवा वर्गासह सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावत आहे.
या गाण्यात सूरज चव्हाणसोबत इंद्रनील कामतचा डान्ससुद्धा लक्षवेधी ठरतो. दोघांचाही डान्स भन्नाट असून, त्यांच्या समन्वयामुळे गाण्याला वेगळीच उंची मिळते. गाण्याचं चित्रीकरण अत्यंत भव्य पद्धतीने करण्यात आलं आहे. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि त्याला साजेसं आधुनिक लोकेशन्सचं मिश्रण गाण्याला एक आकर्षक लुक देतं. यामुळे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर रील्स बनवायला सुरुवात केली आहे.
‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, पायल जाधव आणि मिलिंद गवळी यांसारखे कसलेले कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा चित्रपट साकारला गेला असून, जिओ स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सूरज चव्हाणच्या अभिनयाची आणि डान्सच्या क्षमतेची नवी ओळख प्रेक्षकांना मिळणार आहे, हे निश्चित!