अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ‘बांबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

439 0

‘बॉईज’, ‘बॉईज 2’ आणि ‘गर्ल्स’ नंतर आता विशाल सखाराम देवरुखकर आणखी एक धम्माल चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती केली आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने.

‘बांबू’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून यानिमित्ताने ‘बांबू’चे टिझर प्रकाशित करण्यात आले. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटाची पहिलीच झलक खूप काही सांगून जाणारी आहे. ‘लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन’ म्हणजेच यात प्रेमकहाणी पाहायला मिळणार असून त्यात ‘बांबू’ ही पडणार आहेत. आता हे ‘बांबू’ कोणाला आणि कसे पडणार आहेत, हे पाहाणे रंजक ठरेल.

प्रेमात पडलेल्या, नव्हे लागलेल्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे. विशेष बाब म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ‘बांबू’च्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापूर्वी तिने प्लॅनेट मराठीसाठी ‘अथांग’ या वेबशोची निर्मिती केली आहे जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

निर्माती तेजस्विनी पंडित आपल्या पदार्पणाबद्दल म्हणते, विशाल देवरूखकर यांचे चित्रपट नेहमीच तरुणाईला भुरळ पाडणारे असतात. हल्लीच्या मुलांची भाषा, वागणे, जीवनशैली अशा युवा भावविश्वाभोवती फिरणारे त्यांचे चित्रपट तरूणतरुणींना स्वतःच्या आयुष्यासारखे वाटतात. विशेष म्हणजे या चित्रपटातून काहीतरी बोधही दिला जातो. मला आणि संतोषला ही कथा खूप भावली त्यामुळेच निर्मिती पदार्पणासाठी आम्ही ‘बांबू’ची निवड केली.’’

क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष खेर यांनीही सांभाळली आहे. यापूर्वी क्रिएटीव्ह वाईबने ‘पॉंडीचेरी’ आणि सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटकरता प्रस्तुतकर्त्याची जबाबदारी सांभाळली होती.

दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतो, ” हा एक युथ एंटरटेनिंग चित्रपट आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या साथीदारासोबत पाहावा. कुठेतरी हा चित्रपट तरुणाईला आपल्या आयुष्याशी नक्कीच मिळताजुळता वाटेल”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!