पुणे – जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केल्यानंतर आता वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाद्वारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. जे गणेशभक्त दगडूशेठ गणपती बाप्पांना अभिषेक करतील, त्यांना प्रसाद म्हणून देशी रोप देण्याच्या उपक्रमाला गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात प्रारंभ झाला. गणेशभक्तांनी देखील या उपक्रमाला पाठिंबा देत आम्हीही देशी वृक्षलागवड करु, असा संकल्प श्रीं चरणी केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अभिनेते सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराई संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमाच्या उद््घाटन प्रसंगी मंदिरात अभिनेते सयाजी शिंदे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे आदी उपस्थित होते. यापूर्वी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांनी सहकुटुंब मंदिरात गुढी उभारली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक पुष्पआरास करण्यात आली होती.
मंदिरात गणरायाला अभिषेक करणा-या भक्तांना शमी, मंदार, जास्वंद, चाफा, बकुळ आदी देशी झाडांच्या रोपांचा प्रसाद देण्यात येईल. या रोपांवर एक क्युआर कोड असून तो स्कॅन केल्यानंतर त्या रोपाची संपूर्ण माहिती देखील भक्तांना मिळणार आहे. तसेच रोप ज्या पिशवीमध्ये देण्यात येत आहे, ती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून मातीत रोप लावल्यानंतर त्या पिशवीचे खतात रुपांतर होते. शास्त्रज्ञ विनोद कदम यांनी ही पर्यावरणपूरक पिशवी साकारली आहे. यामाध्यमातून निसर्गाचा समतोल राखला जावा, नागरिकांनी जास्तीत जास्त देशी वृक्षांचे रोपण करावे आणि कोविडसारख्या कोणत्याही संकटाला आपण चांगल्या वातावरणाद्वारे निसर्गाच्या मदतीने दूर ठेऊ, याउद््देशाने उपक्रम राबविला जात आहे.
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, भक्तांना सह्याद्री देवराई संस्थेकडून ही प्रसादरुपी रोपे मिळणार असून ती त्यांनी आपल्या घरी, सोसायटीत, शेतात लावावी, अशी संकल्पना आहे. वृक्षरुपी असा हा आयुष्यभर साथ देणारा बाप्पाचा प्रसाद आहे. त्यामुळे हरित महाराष्ट्र करुन प्रदूषणमुक्त निसर्गाकडे व आरोग्यसंपन्न समाजाकडे वाटचाल करण्यास हा उपक्रम नक्कीच साथ देईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने यापूर्वी महाराष्ट्रातील पालखी सोहळयाच्या वारी मार्गावर वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब यांसारखे ५० लाख देशी वृक्ष लावून संपूर्ण वारी मार्ग व महाराष्ट्रातील प्रमुख महामार्ग हरीत करण्याचा महासंकल्प केला होता. तसेच देहूमध्ये देखील वृक्षारोपण करुन हरितवारीची संकल्पना पुढे नेण्याकरीता ट्रस्टने पुढाकार घेतला होता. आता वृक्ष गणेशा प्रसाद या उपक्रमातून ट्रस्टने पुढचे पाऊल टाकले आहे. गणेशाप्रती असलेली श्रद्धा आणि समाजसेवा याची सांगड घालून निसर्गाची सेवा करण्याकरीता उद्युक्त करणारा वृक्ष गणेशा प्रसाद भक्तांना उपयुक्त ठरेल, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.