अभिनेते सयाजी शिंदे(SAYAJI SHINDE) यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी लाखो झाडं लावली असून, केवळ वृक्षारोपणावर (TREE PLANTATION)न थांबता त्या झाडांची निगा राखली जाते की नाही, झाडांची वाढ कशी होते यावरही ते नियमित लक्ष ठेवतात.
साताऱ्यातील (SATARA)सह्याद्री देवराई (SAHYADRI DEVARAI)प्रकल्पांतर्गत त्यांनी काही वर्षांपूर्वी काही झाडांचे पुनर्रोपण केले होते. यामध्ये एका डेरेदार वडाच्या झाडाचाही(BANYAN TREE) समावेश होता. या वडाच्या झाडाच्या पुनर्रोपणाचा चौथा वाढदिवस नुकताच सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या निमित्ताने झाडाभोवती सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. सुवासिनींनी झाडाला ओवाळणी केली आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र येत निसर्गाची प्रार्थना म्हणत झाडाचा जल्लोषात वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला लहान मुलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वाद्यांच्या तालावर अभिनेते सयाजी शिंदे(SAYAJI SHINDE) यांनीही ठेका धरत सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने वनप्रेमी सह्याद्री देवराई प्रकल्पात उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांमध्ये विशेष आकर्षणाचा ठरला.