अजित पवार (AJIT PAWAR) यांचा 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ (BARAMATI) झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या अपघाताबाबत विविध राजकीय नेत्यांनी शंका उपस्थित केल्या असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(SHARAD PAWAR) गट चे आमदार रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या दिवशी नेमके काय घडले, याची सविस्तर माहिती दिली.
रोहित पवार(ROHIT PAWAR) यांनी सांगितले की, अजित पवार (AJIT PAWAR) यांचा मुंबईहून बारामतीकडे (BARAMATI) होणारा प्रवास सुमारे 210 किलोमीटरचा होता, जो अवघ्या 27 मिनिटांत पूर्ण होणार होता. संबंधित विमान हे ‘VSR’ कंपनीचे असून ते अमेरिकेत तयार करण्यात आले होते. विमानात डाव्या बाजूला अजित पवार(AJIT PAWAR) बसले असण्याची शक्यता असून, मागील भागात बॅगा आणि इंधनाच्या टाक्या होत्या. या कंपनीकडे लेअरजेट प्रकारच्या विमानांची देशात मोठी संख्या असून, या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अपघाताच्या दिवशी सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी विमान क्रू एअरपोर्टवर पोहोचले. कॅप्टनने बारामती एअरपोर्टशी संपर्क साधून दृश्यमानतेबाबत माहिती घेतली. 7.10 वाजता उड्डाणासाठी ‘ओके’ असा संदेश मिळाला. त्यानंतर अजित पवार यांचे पीए विदीप जाधव विमानतळावर आले आणि 7.30 वाजता अजित पवार(AJIT PAWAR) विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विमानाने उड्डाण केले.
विमानाने 8.22 वाजता लोणावळा, 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवत परिसर आणि 8.32 वाजता सुपेजवळील हद्द ओलांडली. मात्र 8.43 ते 8.45 या कालावधीत विमानाचा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले. सकाळी 9 वाजता अजित पवार जखमी असल्याची माहिती मिळाली, मात्र 9.45 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वांचे मन सुन्न झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबतही माहिती दिली. विमानाच्या ‘युनिव्हर्सल अँप वरून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान सुमारे 16 वर्षे जुने होते. अपघातापूर्वी 25 आणि 26 जानेवारी रोजी हेच विमान सुरतला जाऊन आले होते. कंपनीच्या मालकांनी विमान सुस्थितीत असून त्याचे नियमित मेंटेनन्स झाले होते आणि वैमानिक अनुभवी असल्याचा दावा केला आहे. अपघाताचे कारण दृश्यमानतेचा अभाव असू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र, गावाच्या परिसरातून विमान जात असताना त्याचा आवाज वेगळा वाटत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे विमानाच्या मेंटेनन्समध्ये काही तांत्रिक अडचण असण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान तिरके होत खाली कोसळताना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.