इस्लामाबाद – गेल्या काही वर्षांपासून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्ताची अवस्था आता श्रीलंकेसारखी होणार आहे. पाकिस्तानमध्ये एका झटक्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव तब्बल शंभर रुपयांच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या डोक्यावर महागाईचा आगडोंब कोसळणार आहे.
आजपर्यंत पाकिस्तानने भारताचा द्वेष आणि दहशतवाद यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. त्याचे परिणाम आता देशाला भोगावे लागणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गानंतर संपूर्ण जगभरात महागाई वाढत आहे. पाकिस्तानचा विचार केल्यास तेथील राजकीय संकट दूर झालेले असले तरीही सत्ता बदलल्यानंतर देशातील स्थिती आणखी खराब झाली आहे.
पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर ठरवरी संस्था असलेल्या Oil and Gas Regulatory Authority संस्थेने इंधनाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पेट्रोलचे दर ८३.५ रुपयांनी तर डिझेलची किंमत तब्बल ११९ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात सध्या शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेत आहे इमरान खान यांच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता सरकार बदलल्यानंतर शाहबाज शरीफ यांच्या काळात पाकिस्तानच्या जनतेला महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याची चिन्ह आहेत.
सध्या पाकिस्तानमध्ये (१ एप्रिलचे दर) पेट्रोल रु. १४९. ८६ तर डिझेल १४४. १५ रु प्रति लिटर दराने विकले जात आहे. म्हणजेच इंधन दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पेट्रोल २३३. ३६ रुपये तर डिझेल २६३. १५ रुपये प्रति लिटर दराने विकले जाऊ शकते.
ऑईल अँड गॅस रेग्युलटरी अथॉरिटीकडून दोन प्रकारच्या शिफारशी करण्यात येतात. पहिल्या पद्धतीत ग्राहकांवर बोजा टाकण्यात येतो. तर, दुसऱ्या पद्धतीत ग्राहकांवर काही प्रमाणात दरवाढीचा बोजा टाकला जातो. दुसऱ्या पद्धतीचा विचार केल्यास ओजीआरएकडून पेट्रोलच्या किमतीत २१ तर डिझेलच्या किमतीत ५१ रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.