हत्ती Vs गाढव? US मध्ये कोण सरस? ट्रम्प-हॅरिस यांच्यात चुरस!

1936 0

अमेरिकेत एकमेकांविरूद्ध निवडणूक रिंगणात उतरणारे दोन पारंपरिक पक्ष म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष. पण, या दोन्ही पक्षांची चिन्हं या राजकीय पक्षांइतकीच प्रसिद्ध आहेत.

रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह आहे हत्ती तर डेमोक्रॅटिक पक्षाचं चिन्ह आहे गाढव! अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस निवडणूक लढवत आहेत. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, हत्ती आणि गाढव हे दोन प्राणी या पक्षांची चिन्हं कशी काय बनली? जाणून घेऊयात…

हत्तीप्रमाणं शक्तिशाली रिपब्लिकन पक्ष

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जशी ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात आहे तितकीच ती हत्ती आणि गाढव या दोन चिन्हांमध्येही आहे. 7 नोव्हेंबर 1874 पासून ‘हत्ती’ हे रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह बनलं. अमेरिकेतील थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध व्यंगचित्रकारानं ‘हार्पर वीकली’ या मासिकात हत्ती चितारून एक व्यंगचित्र प्रकाशित केलं. थॉमस
नॅस्ट यानं या व्यंगचित्रात रिपब्लिकन पक्षाची गुणवैशिष्ट्ये दाखवताना सामर्थ्य, स्थिरता आणि भक्कम धोरणांचं द्योतक म्हणून ‘हत्ती’चा वापर केला. रिपब्लिकन पक्ष हा हत्तीप्रमाणं शक्तिशाली प्राणी असल्याचा संदेश त्यानं आपल्या व्यंगचित्रातून देण्याचा प्रयत्न केला. भविष्यात, हत्ती हेच चिन्ह रिपब्लिकन पक्षाची ओळख बनलं.

गाढवाप्रमाणं साधा व कष्टाळू डेमोक्रॅटिक पक्ष

गाढव हे चिन्ह डेमोक्रॅटिक पक्षाची ओळख बनण्यामागंही एक सुरस कथा आहे. 1828 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या अँड्र्यू जॅक्सन यांच्याशी ही कथा जोडली जाते. या निवडणुकीत विरोधकांनी जॅक्सन यांना ‘जॅकस’ (गाढव) असं संबोधून त्यांना अपमानित केलं. मात्र, जॅक्सन यांनी हा अपमान नं समजता त्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि आपल्या प्रचारात गाढवाचा वापर केला. थॉमस नॅस्ट या व्यंगचित्रकारानं 1870 च्या दशकात आपल्या व्यंगचित्रांमध्ये गाढवाचं रूपक म्हणून वापरणं सुरूच ठेवलं. साधेपणा, कष्टाळूपणा आणि सर्वसामान्यांविषयीची निष्ठा ही गाढवाची गुणवैशिष्ट्ये ओळखून पुढं डेमोक्रॅटिक पक्षानं गाढवाला आपलं चिन्ह बनवलं. हत्ती आणि गाढव ही दोन्ही चिन्हं आता अमेरिकन राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत.

आता यंदाची निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनणार की डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा नवा इतिहास रचणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. थोडक्यात, रिपब्लिकन पक्षाचा ‘हत्ती’ बाजी मारणार की गाढव जिंकणार हे लवकरच स्पष्ट होईल.

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News
error: Content is protected !!