मुंबई- शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर जाधव यांच्या घरावर छापे मारण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ही धाड मारण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. 1997मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मधला काही काळ वगळता ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.
यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या याआधीच्या तपासात उघड झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी आयकर विभागानं केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा करण्यात आला होता.
यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी असल्याचं स्पष्ट झालं होतं. यामिनी जाधव 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता, असं आयकर विभागाचं म्हणणं आहे. महावर यांनी सन 2011-12 मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केल्याचं महावर यांनी चौकशीत सांगितलं होतं. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती.
2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याडकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. यात 2.74 कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यात 1.72 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळालं होतं.