Breaking News

स्वरसम्राज्ञीची स्वरयात्रा विसावली ; भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली – अभाविप

271 0

भारताची ‘गान कोकिळा’ लता मंगेशकर यांचे आज दि.०६ फेब्रुवारीला मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. काही दिवसापूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे १८०० हून अधिक चित्रपटांतील विविध प्रकारची २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांपर्यत आहे. लता दीदींचा सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून उल्लेख आहे.
लता मंगेशकर यांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. भारतीय संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. १९४२ मध्ये लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांची ही कारकीर्द टिकून आहे. लता दीदींच्या कार्याचा गौरव करत केंद्र शासनाच्या वतीने त्यांना १९६९ ला पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण व २००१ ला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी लतादीदीच्या निधनावर शोक व्यक्त करतांना सांगितले कि, “लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. स्वरसम्राज्ञीची स्वरयात्रा विसावली. ईश्वर लतादीदींच्या पुण्यात्मा ला सद्गती देवो व त्यांचे कुटुंबीय व असंख्य चाहत्यांना लतादीदीच्या निधनाने दु:ख पेलण्याची शक्ती प्रदान करो.”

Share This News
error: Content is protected !!