बुलढाण्यात पैनगंगा नदीत पडली रिक्षा; नागरिकांच्या सतर्कतेमुळं रिक्षाचालकाचे वाचले प्राण

217 0

बुलढाणा: बुलढाण्यातील अफजलपूरवाडीनजीक पैनगंगा नदीतील खड्डयात रिक्षा पडल्याची घटना घडली. पाण्यामुळं खड्डयाचा अंदाज न आल्यानं रिक्षा खड्डयात जाऊन पडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळं रिक्षाचालकाचे प्राण वाचले आणि त्यांनी रिक्षाही खड्डयातून बाहेर काढली. 

बुलढाणा तालुक्यातील अफजलपूरवाडीकडं जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचं तर पैनगंगा नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे. बुलढाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी या पुलाच्या बांधकामाजवळच नदीचं खोलीकरण करून गौण खनिज वापरण्यात आलं होतं. त्यामुळं रस्त्याच्या शेजारी नदीत खोल खड्डा पडला आहे. मुसळधार पावसामुळं नदी दुथडी भरुन वाहू लागली असून खड्डयाचा अंदाज न आल्यानं अफजलपूरवाडीकडं जात असलेली एक रिक्षा या खड्डयात पडली. या घटनेत देऊळघाट येथील चालक शेख फरहान शेख आवेस पूर्णपणे बुडाले होते. ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्वरित धाव घेऊन रिक्षाचालकाला बाहेर काढलं व त्यानंतर रिक्षाही पाण्याबाहेर काढली. दरम्यान, संबंधित पुलाच्या बांधकामाजवळ दोन्ही बाजूस सेफ्टी गार्ड लावण्यात यावेत जेणेकरून भविष्यात अशा अनुचित घटना घडणार नाहीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा तालुकाध्यक्ष आकाश माळोदे यांनी केलीये.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide