मुंबईत मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये मंत्रालयात ३ फेब्रुवारी रोजी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेसंदर्भात सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.या सामंजस्य करारात महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेची अंमलबाजवणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करणे, प्रचार-प्रसार करणे, समुदाय सहभाग व क्षमता बांधणी करणे, बीजेएसच्या मोबाईल अॅपद्वारे सर्व ग्रामपंचायतींपर्यंत ही योजना पोहोचविणे तसेच मागणी जमा करून शासनापर्यंत पोहोचविणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीजेएसने आतापर्यंत पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच महाराष्ट्र पाणीदार बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन बीजेएसचा उपयोग करून घेणार असल्याचे सांगितले. तर संपूर्ण महाराष्ट्रात एक जनआंदोलन उभे करून राज्य शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बीजेएस कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही शांतिलाल मुथ्था यांनी दिली. याप्रसंगी मृद जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, ओएसडी प्रिया खान, बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्य सचिव प्रवीण पारख, प्रकल्प संचालक दीपक सहा आदी मान्यवर उपस्थित होते.