मुंबई- वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे. एक सणच आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांची जयंतीही तिथीनेच साजरी झाली पाहिजे, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
साकीनाका येथे मनसेच्या शाखेचं राज ठाकरे (raj thackeray)यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना या सूचना केल्या. तसेच पुढच्यावेळी शिवजयंती तिथीने याही पेक्षा जल्लोषात साजरी करण्याचं आवाहन केलं. यावेळी मनसे सैनिकांनी टाळ्याच्या गजरात राज यांच्या या सूचनेचं स्वागत केलं. तसेच यावेळी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोचा जयघोषही केला. या कार्यक्रमाला मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीने साजरी केली तरी काही हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे ?
तिथिनेच शिवजयंती का साजरी करायची? याचं एकमेव कारण आपल्याकडे जेवढे सण येतात, मग ती दिवाळी, गणपती जेवढे काही सण येतात ते आपण तिथिने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात. गणेशोत्सव तिथीनुसार येतो. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा. म्हणजे तो आज केला पाहिजे असं नाही. जेव्हा तिथीने साजरी करायची तेव्हा याहून अधिक जल्लोषात साजरी करा, असं ते म्हणाले.