पर्यावरण संवर्धन आणि निसर्गरक्षणाचा ठाम संदेश देणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ(MADHAV GADGIL) यांचे बुधवारी रात्री पुण्यात(PUNE) निधन झाले.अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि अभ्यासू आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गाडगीळ(Dr. GADGIL) यांच्यावर पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग (Dr. SHIRISH PRAYAG)यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, अंत्यदर्शनासाठी पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
डॉ. माधव गाडगीळ(Dr. MADHAV GADGIL)यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग, जैवविविधता आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केले. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला ‘गाडगीळ समिती अहवाल’ आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, हा त्यांचा विचार होता.
पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने डॉ. माधव गाडगीळ(Dr.MADHAV GADGIL) यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये शोककळा पसरली असून, निसर्गसंवर्धनासाठी झटणारा एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.