मुंबई : देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशात कौतुक होताना दिसत आहे. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. यादरम्यान आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. याचा फायदा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. चला तर मग त्यांनी नेमकी कोणती घोषणा केली? ते जाणून घेऊया..
केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे रस्ते तीन प्रकारे बांधले जातात. ‘बिल्ड-ऑपरेट-हँडओव्हर’ (BOT) व्यतिरिक्त, यामध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम आणि हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल यांचा यामध्ये समावेश आहे.
ईपीसीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची गरज लवकर सुरू होते. त्याच बरोबर BOT च्या माध्यमातून रस्ते चांगले बनवले जातात. कारण पुढील 15-20 वर्षे देखभालीचा खर्च त्यांना उचलावा लागतो, हे ठेकेदाराला माहीत आहे. त्यामुळे आम्ही BOT च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधण्याचा निर्णय घेतल्याचे गडकरींनी सांगितले.