नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 16 बालकांचा समावेश आहे यामुळे प्रकरण अजूनच तापले आहे. औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याने खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी आता खासदार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताना शौचालयाची सफाई करायला लावली होती. याच प्रकरणात अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राज्यातील मार्ड डॉक्टर खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड मधील शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी माफीची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण राज्यातील डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे मार्डने म्हटलं आहे. मार्डने पत्रक काढून ही मागणी करण्यात आली आहे.